भेंडाळा परिसरात शोककळा; अनियमित पाऊस आणि आर्थिक विवंचनेने शेतकरी कुटुंब संकटात, शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर…
गडचिरोली : शेतीसाठी घेतलेले कर्ज, अनियमित पावसामुळे धानपिकाचे झालेले नुकसान आणि कर्जाची परतफेड कशी करायची, या आर्थिक विवंचनेतून चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील ३६ वर्षीय शेतकरी सचिन भाऊजी सातपूते यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी जीवन संपविल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि शेतीसमोरील अनिश्चिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सचिन सातपूते हे घटनेच्या दिवशी सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास आपल्या शेतावर गेले होते. यंदाच्या हंगामात पावसाच्या अनियमिततेचा त्यांच्या शेतीला मोठा फटका बसला होता. पावसाअभावी शेतातील धानपीक करपून गेल्याने अपेक्षित उत्पादनाची आशा मावळली होती. वर्षभर कष्ट करूनही हातात उत्पन्न येण्याची शक्यता कमी झाल्याने त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते.
अडीच ते तीन लाखांचे कर्ज, परतफेडीची चिंता…
शेतीच्या मशागतीपासून ते पीक उत्पादनापर्यंतच्या विविध कामांसाठी सचिन सातपूते यांनी अडीच ते तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सोसायटी, बचत गट आणि बँकेचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होते. मात्र, यंदा धानपीकच करपून गेल्याने कर्जाची परतफेड कशी करायची, हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता.
एका बाजूला शेतीचे नुकसान आणि दुसऱ्या बाजूला कर्जफेडीची जबाबदारी, अशा दुहेरी संकटात ते सापडले होते. शेतीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता मावळल्याने त्यांची आर्थिक विवंचना वाढली होती. याच परिस्थितीत त्यांनी आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
आई, पत्नी आणि भावावर दुःखाचा डोंगर…
सचिन सातपूते यांच्या निधनाने भेंडाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या व्यक्तीच्या अचानक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेतात राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाच्या अनियमिततेमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे अशा टोकाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागणे ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याची भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.